Women’s Health and Ayurveda

शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम् ।
यत्रैतास्तु न शोचन्ति ह्मप्रासीदन्ति वर्धते तद्धि सर्वदा ॥
– मनु| 3|57

ज्या कुटुंबामध्ये महिला (आई, पत्नी, बहिण, मुलगी) या दुःखी राहतात, त्या कुटुंबाचा नाश होतो व ज्या परिवारात त्या सुखी राहतात, ते घर समृद्ध होते.

आज जागतिक महिला दिन ….
वरील श्लोकाप्रमाणे महिला सुखी राहण्यासाठी त्या निरोगी असणे आवश्यक आहे. महिला निरोगी राहण्यासाठी त्या मानसिक व शारीरिकरीत्या स्वस्थ असल्या पाहिजेत. महिलांना आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. हे सर्व करताना आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, मासिक पाळीदरम्यान सांगितलेली परिचर्या पालन केल्यास निरोगी राहण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये महिलांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर वनस्पती सांगितल्या आहेत, त्यातील काही निवडक वनस्पतींचे वर्णन खाली करीत आहे.

शतावरी – Aspragus racemosus
मेध्य असून, मेंदूला बल देणारी आहे. रक्तपित्तशामक, गर्भाशयपोषक, स्तन्यजनन, वाजीकर आहे.गर्भस्राव, रक्तप्रदर, स्तन्य कमी उत्पन्न होणे या विकारांत शतावरी कल्प रसायन कार्य करतो. त्याचप्रमाणे शतावरी नेत्रास हितकर, अम्लपित्त, आमाशयव्रण, ग्रहणीव्रण यातही उपयोगी, सर्वसामान्य दौर्बल्य यातही बल्य म्हणून उपयोगी.

हरिद्रा – Curcuma longa, योषितप्रिया, रजनी, निशा
हळदीच्या अनेक व उत्कृष्ट गुणांमुळे प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीस हळदीने आपला प्रथम क्रमांक लावला आहे. पचन सुधारणे, स्तन्यशुद्धीसाठी उपायोगी. ओल्या हळदीचे चूर्ण मध किंवा कोमट पाण्यासोबत सकाळी घेतल्यास मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारते. अंगाला खाज येणे, शीतपित्त यामध्येही अतिशय उपयोगी.

अश्वगंधा – Withania somnifera
कृश महिलांनी याच्या मुळांचे चूर्ण वेलदोड्याच्या चूर्ण, सोबत सकाळ संध्याकाळ १ चमचा घेतल्यास व सोबत प्राणायम केल्यास फायदा होतो. कटिशूलामध्येही अश्वगंधाचूर्णाचा उपयोग होतो. बल्य, बृहण, रसायन गुणांनी परिपूर्ण असल्याने शोषात उपयोगी.

कुमारी – Aloevera indica, कोरफड
लहानपणापासून रजस्वला होईपर्यंत भूक वाढण्यासाठी, दृष्टी नीट ठेवण्यासाठी उपयोगी. नेत्ररोगात गर डोळ्यावर बांधतात. स्वरस दाहशामक आहे. सर्वसामान्य दौर्बल्यात कोरफड रस शक्तिवर्धक म्हणून देता येतो.

दुर्वा – Cynodon dactylon
दुर्वा पानाचा रस सकाळ संध्याकाळ, चार चमचे घेतल्यास पोटाचा आकार कमी होण्यास मदत होते. गर्भाचा रंग सुधारण्यासाठी दुर्वा कल्पाचा उपयोग होत्तो. गर्भिणीला रक्त कमी असल्यास दुर्वा स्वरस + मनुका यांचा फायदा होतो.

डाळिंब – Punica granatum, दाडिम
डाळिंब रूचिवर्धक असल्याने भूक वाढण्यास मदत करते. याने ग्रहणीगत पचन सुधारते. अग्निमांद्य, अम्लपित्त, रक्ताल्पता यामध्ये अतिशय उपयोगी. सर्वसाधारण दौर्बल्यात फलरस उपयोगी. पण शक्यतो दाणे चावून चावून खावेत.

अशोक – Saraca india
शोक नष्ट करणारी, स्त्रीमित्र. गर्भाशयाच्या अनेक विकारांत उपयोगी. अशोकचा विशेष सांगावयाचा झाल्यास ‘प्रदरादि स्त्रीरोग’ एवढा निश्चितपणे सांगता येईल.
सालीचा क्षीरपाकही फायदेशीर.

उपयुक्त कल्प – शतावरी कल्प, अश्वगंधारिष्ट, दाडिमावलेह, सौभाग्यशुंठीपाक, अशोकारिष्ट

स्त्रीरोग व आयुर्वेद, या विषयावर वैद्यराज श्री. समीर गोविंद जमदग्नी यांची मुलाखत.

जागतिक महिला दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा …..